फलटण चौफेर दि २९ ऑगस्ट २०२५
साताऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभरापूर्वी तळबीड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या धाडसी दरोड्याचा छडा लावत तब्बल ७६ लाख ९४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात ९२ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तसेच गुन्ह्यात वापरलेली कारचा समावेश आहे.
दिनांक ३० जुलै रोजी पहाटे कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्याजवळ श्रावणी हॉटेल समोर प्रवाशांना घेऊन थांबलेल्या एस.टी. बसमध्ये घुसून टोळीने कृष्णा कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यावर तलवारीने व लाथाबुक्क्यांनी हल्ला करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने व ३२,५०० रुपये रोख रक्कम जबरीने लुटली होती. या प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परितोष दातीर व पथकाने सखोल तपास करून राहुल दिनेश शिंगाडे (रा. माण), महावीर हणमंत कोळपे (रा.बिबी फलटण), अभिजीत महादेव करे (रा.रावडी फलटण), अतुल महादेव काळे (रा. माळशिरस, सोलापूर) व इतर फरार संशयतांना ताब्यात घेतले. संशयित महावीर कोळपे कृष्णा कुरिअरमध्ये पूर्वी काम करत होता. त्यामुळे कुरिअर कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान दागिने असतात हे त्याला ठाऊक होते. त्यानेच टोळीतील इतर साथीदारांना प्रवासाची माहिती देऊन दरोड्याचा प्लॅन आखला होता.पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने सलग सात दिवस भालधोंडीच्या जंगलात शोध मोहीम राबवून फरारी आरोपी अतुल काळे व अभिजीत करे यांना अखेर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली.
या कारवाईत ७१ लाख ९४ हजार २५० रुपये किमतीचे ९२ तोळे सोन्याचे दागिने व ५ लाख रुपये किमतीची कार हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत ७६ लाख ९४ हजार २५० रुपये इतकी आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी तपासात पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर तसेच इतर अंमलदारांनी सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.